पिंपरी: वर्षाच्या पहिल्याच दिवशी शहर आनंदोत्सव साजरा करत असताना पोलीस दलावर मात्र शोककळा पसरली आहे. शहरात वर्षअखेरीस तसेच कोरेगाव-भीमा येथे मानवंदना पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी लावलेली नाकाबंदी तपासण्यासाठी जात असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास निघोजे येथे महिंद्रा कंपनीसमोर ही दुर्दैवी घटना घडली. जितेंद्र सुरेश गिरनार (३८. रा. जापोरा, ता. शिरपूर, जिल्हा धुळे) असे अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ट्रेलरचालक गणेश राय (रा. तिरंगा चौक, छत्तीसगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार हे महादुर्ग एमआयडीसी पोलीस ठाण्यात मागील एक वर्षापासून नेमणुकीस होते. वर्षअखेर तसेच कोरेगाव-भीमा येथील शौर्यस्तंभ मानवंदना या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हद्दीमध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. तसेच वाहनांची तपासणी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात होती. जितेंद्र गिरनार हे ठिकठिकाणी लावलेली नाकाबंदी, बंदोबस्त तपासणीचे काम करत होते, नाकाबंदी तपासणी केल्यानंतर सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या खासगी क्रेटा कारमधून एचपी चौक ते तळवडे ब्रिजदरम्यान गस्त घालत होते.
निघोजे येथे महिंद्रा कंपनीच्या गेट क्रमांक एकसमोर आले असता समोरील ट्रेलरला धडकल्याने अपघात झाला. यामध्ये गिरनार गंभीर जखमी झाले. त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. गिरनार हे मूळचे धुळे जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांची एक लहान मुलगी आहे.
कॉन्स्टेबल ते उपनिरीक्षक प्रवास..
गिरनार हे पुणे शहर पोलीस दलात २००८ मध्ये कॉन्स्टेबल पदावर भरती झाले होते. त्यांनी खात्यांतर्गत परीक्षा दिली आणि ते २०१६ मध्ये पोलीस उपनिरीक्षक बनले. त्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली. पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरनार पूर्वी भोसरी एमआयडीसी आणि वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यानंतर मागील एक वर्षभरापूर्वी त्याची महाळुगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली होती.