यवत : दौंड तालुक्यातील यवत गावाच्या हद्दीतील अनुराज शुगर लिमिटेड साखर कारखान्याच्या ८४ कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आल्याने, या ८४ कामगारांनी कारखान्याच्या गेटवरच आंदोलन सुरू केले आहे. गेल्या पाच दिवसांपासून हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू असून, साखर कारखाना व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. याबाबत आंदोलन करणाऱ्या कामगारांनी जोपर्यंत आम्हाला कामावर घेत नाही, तोपर्यंत आम्ही गेटसमोर बसून राहणार, असे भीमा साखर कामगार संघाच्या अनुराग शुगर शाखेचे अध्यक्ष सचिन थोरात यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे व सचिव राजेंद्र तावरे पाटील, भीमा साखर कामगार संघ (मधुकरनगर, पाटस) शाखेचे खजिनदार केशव दिवेकर यांनी या आंदोलकांची भेट घेतली असून, त्यांनी कारखान्यावर सडेतोड टीका केली आहे. कामगारांना बेकायदेशीररित्या कामावरून काढून टाकणे ही दडपशाही आहे.
हा कारखाना संविधान आधारित कायद्यावरती चालतो की, येथे हुकूमशाही आहे, हे समजत नाही. कामगारांच्या रक्ताने उभा राहिलेला हा कारखाना आज कामगारांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी असे काही षडयंत्र रचत असेल, तर याला त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असे या वेळी केशव दिवेकर यांनी सांगितले. कामगारांना कामावर न घेतल्यास, एकही गाडी गेटच्या आत-बाहेर सोडली जाणार नाही. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला संपूर्णपणे अनुराग शुगर व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिला.
या वेळी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष युवराज रणवरे म्हणाले क, अनुराग शुगर येथे ८४ कामगारांना केवळ कारखाना सांगेल त्या संघटनेतच काम करा, असे सांगून दबाव निर्माण केला आहे. कामगारांनी भीमा पाटस साखर कामगार संघटना या शाखेची स्थापना केल्यामुळे व्यवस्थापनाला अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळेच या ८४ कामगारांना काढल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. कामगारांनी कुठल्या संघटनेत काम करायचे हे व्यवस्थापन ठरवू शकत नाही. तो त्यांचा वैयक्तिक अधिकार असून, अनुराज शुगर व्यवस्थापनाचा या वेळी जाहीर निषेध करण्यात आला.
सचिव राजेंद्र तावरे पाटील यांनी कामगारांना या वेळी आश्वासन दिले की, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळामध्ये काम करणारे महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख कामगार या अनुराग शुगर व्यवस्थापनाने बेकायदेशीरपणे कामावरून काढलेल्या कामगारांसोबत आहेत. वेळ आली तर मोठे आंदोलन करण्यात येईल, याची जाण अनुराज शुगर व्यवस्थापनाने घ्यावी.
“कामगार एकजुटीचा विजय असो” अशा घोषणांनी कारखाना परिसर देण्यात आल्या. या वेळी अनुराज शुगर व्यवस्थापनाकडून आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या ठिकाणावर सीसीटीव्ही बसवण्यात आला असून, कामगारांवर व्यवस्थापनाने तिसरा डोळा ठेवला आहे.
याबाबत व्यवस्थापनासोबत संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. सध्या शांततेच्या मार्गाने सुरू असलेले हे आंदोलन कारखाना, व्यवस्थापन समिती व कामगारांनी तत्काळ बैठक घेऊन, तोडगा काढून निर्णय घ्यावा, अन्यथा कारखान्यावरती चालू असलेले हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.