दीपक खिलारे
इंदापूर : झारखंडमधील गिरिडीह येथील पवित्र तीर्थक्षेत्र समेद शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याची अधिसूचना जारी केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि.२१) इंदापूर तालुक्यातील समस्त सकल जैन समाजाच्या वतीने जाहीर मोर्चा काढण्यात आला.
मोर्चामध्ये इंदापूर तालुक्यातील विविध गावातून शेकडो जैन समाज हा इतिहासात पहिल्यांदाच रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शहरातून जुन्या कचेरी शेजारील जैन मंदिरापासून निघालेला हा निषेध मोर्चा मेन पेठ – पंचायत समिती – बाबा चौक मार्केट कमिटी मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला.
जैन धर्मीयांचे म्हणणे आहे की, जर याला पर्यटन क्षेत्र बनवले तर पर्यटकांच्या येण्याने येथे मांसाहार आणि दारूचे सेवनही होईल. पवित्र तीर्थक्षेत्र परिसरात अहिंसावादी जैन समाजासाठी अशी कृत्ये असह्य आहेत. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत मत्स्य आणि कुक्कुटपालनालाही परवानगी देण्यात आली आहे.
जैन धर्मात समेद शिखरजींबद्दल अशी श्रद्धा आहे की ज्याप्रमाणे गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात, त्याचप्रमाणे त्यांची पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात. जैन समाजाचे लोक समेद शिखरजी येथे २७ किलोमीटरच्या परिघात पसरलेल्या मंदिरांना भेट देतात आणि प्रार्थना करतात.
जैन धर्माचे लोक पूजेनंतरच अन्नसेवन करतात. समेद शिखरजींच्या या परिसराचा प्रत्येक कण पवित्र आणि पूजनीय आहे, अशी जैन समाजाची श्रद्धा आहे. या प्रदेशातून लाखो जैन मुनींनी मोक्ष मिळवला आहे. सरकारने इतर धर्मीयांच्या तीर्थस्थळांचे जसं संरक्षण केले आहे, त्याचप्रमाणे समेद शिखरजींनाही संरक्षण मिळावे व सम्मेद शिखरजींनाही केवळ धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी जैन बांधवांनी केली.
या निषेध मोर्चामध्ये रोटरी क्लबचे नरेंद्र गांधी, डॉ. श्रेणिक शहा, ॲड. अशोक कोठारी, डॉ. सागर जोशी, धरमचंद लोढा, प्रकाश बलदोट्टा, बागेरेचा शेठ, संजय बोरा, जवाहर बोरा, मिलिंद दोशी, संतोष व्होरा, डॉ. विकास शहा, वैभव दोशी, विपुल व्होरा, पुष्कर गांधी, सिद्धांत दोशी, निलेश बोरा, विलास मेहता, साजन चंकेश्वरा, भारत गांधी आदी आंदोलकांसह शेकडो महिला, बालके या निषेध मोर्चात सामील झाले होते.