Onion export : नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी लागू केलीय. 31 मार्च 2024 पर्यंत ही बंदी घालण्यात आलीय. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतलाय. मात्र या बंदीचा थेट फटका राज्यातला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांमध्येही तीव्र नाराजी आहे. बंदीच्या निर्णयानंतर मनमाड तसंच लासलगावसह अनेक बाजार समितांमध्ये कांद्याचे लिलाव झालेले नाहीत. तर अनेक ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव बंद पडले
मार्चपर्यंत केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदी निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत. उमराणा इथं कांदा व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडत निषेध केला तर शेकडो शेतकऱ्यांनी निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको केला. नांदगावमध्येही संतप्त शेतकऱ्यांनी येवला रोडवर उतरत आंदोलने केली. मनमाड, मुंगसे येथे व्यापाऱ्यांचे कांदा लिलाव बंद पडले.
कांदा निर्यात बंदीचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये दिसून आले आहेत. चांदवडमध्ये सुरु असलेलं आंदोलन चिघळलंय. चांदवडमध्ये शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला होता. तेव्हा आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. एक तासापेक्षा जास्त काळ हे आंदोलन सुरु होतं. त्यामुळे वाहतुकीला फटका बसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. दुसरीकडे नाशिकच्या उमराणे गावात रास्तारोको करण्यात आला. कांदा निर्यात बंदीवरून शेतकरी आक्रमक झालेयत. 31 मार्च 2024 पर्यंत कांद्यावर निर्यात बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेयत.
सोलापूरात कांदा लिला बंद
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील पदाधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं. तसंच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. हमालांनी माल उचलण्यास नकार दिल्याने कांदा लिलाव बंद पडले आहेत.