पुणे : पुण्यातील मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने उघडकीस आणला आहे. ही कारवाई पोलिसांच्या पथकाने मंगळवारी ७ जानेवारी रोजी सायंकाळी केली आहे. सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका मसाज पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी पार्लरचालक महिलेला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेतील सहायक पोलीस फौजदार छाया जाधव यांनी नांदेड सिटी (सिंहगड रस्ता) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून जोयश्री नरेन तामोली (वय-३२, रा. नांदेड फाटा, सिंहगड रस्ता, मूळ रा. बामुनगाव, जि. जोराहाट, आसाम) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात डे स्पा या मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यवसाय सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली. मसाज पार्लरमधून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तामोली हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भोस करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांंच्याकडे शहरातील वेगवेगळ्या भागात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. मसाज पार्लरमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांवर पोलीस आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले होते. गेल्या वर्षभरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी ३३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.