दीपक खिलारे
इंदापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात राबवलेल्या मोफत अन्नधान्य योजना, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी असंख्य विकासाभिमुख योजनांमुळे घराघरात समृद्धी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे राज्यात व पुणे जिल्ह्यात भाजपचा जनाधार वाढत चालला आहे, असे गौरवोद्गार भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बोरी येथे काढले.
बोरी (ता. इंदापूर) गावामध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या गाव चलो अभियानास शनिवारी (दि.10) दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बोरी गावामध्ये शनिवारी रात्री मुक्काम केला. तर रविवारी (दि.11) सकाळी ग्रामस्थांशी चहापान करत गाठीभेटी घेत या मुक्कामी अभियानाचा हर्षवर्धन पाटील यांनी समारोप केला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे देशव्यापी अभियान महाराष्ट्रात सुरु आहे. भाजप हा समाजातील सर्व घटकांना व सर्व जाती-धर्मांना बरोबर घेऊन विकास करणारा पक्ष आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 51 टक्के मते भाजपला मिळाली पाहिजे, यासाठी इंदापूर तालुक्यातील 327 बुथवरील भाजपचे कार्यकर्ते केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करत आहेत, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
या अभियानामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी बोरी गावामध्ये ठिकठिकाणी चर्मकार, मुस्लिम, लोहार, ब्राम्हण, मारवाडी, कुंचीकोरवे समाज (केरसुनी व्यवसाय), वडार तसेच घोंगडी विणकर व्यवसायिक, जेष्ठ नागरिक, माहीला, युवक वर्गाची भेट घेऊन चर्चा केली व त्यांच्या समस्या एकूण घेतल्या. तसेच द्राक्ष शेती, पॉलिहाऊस यांची पाहणी केली. त्याचप्रमाणे डॉ. हरिभाऊ वाघमोडे आश्रमशाळेत भेट देऊन तेथे 51 हजार रुपयांची रोख देणगी दिली.
तसेच हर्षवर्धन पाटील खंडोबा मंदिर येथे आरती केली. यावेळी पृथ्वीराज जाचक व मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रात्री हर्षवर्धन पाटील यांनी वैभव देवडे या कार्यकर्त्याच्या घरी मुक्काम केला.
बोरी हे प्रगतशील गाव, याचा आम्हाला अभिमान
हर्षवर्धन पाटील म्हणाले, बोरी हे प्रगतशील गाव आहे याचा आम्हाला अभिमान आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचे पासून सुमारे 72 वर्षे झाली या गावाशी आमचे ऋणानुबंध आहेत. गावातील शेतकरी, युवक महिलावर्ग कष्टाळू व मेहनती आहेत. त्यामुळे आज बोरीचे नाव महाराष्ट्रात आदराने घेतले जात आहे.
भाजप पुणे जिल्हा (फादर बॉडी) उपाध्यक्षपदी वैभव देवडे
यावेळी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (फादर बॉडी) उपाध्यक्षपदी वैभव देवडे व भाजपच्या इंदापूर तालुका युवा मोर्चाच्या सचिवपदी सनी गवळी या दोघांना नियुक्तीपत्रे भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व तालुकाध्यक्ष ऍड.शरद जामदार यांचे हस्ते देण्यात आली. तसेच यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्ते विनायक ढालपे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या अभियानाच्या दुसरे दिवशी रविवारी (दि.12) सकाळी हर्षवर्धन पाटील यांनी काही कार्यकर्त्यांच्या घरी नाष्टा चहापान करत चर्चा केली. हर्षवर्धन पाटील यांच्या या गाव चलो अभियानामध्ये इंदापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रस्त्यांना निधी म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकास नव्हे
विद्यालये, कॉलेज, सहकारी संस्था, कृषी प्रक्रिया संस्था काढणे व चालविणे, आरोग्य सेवा, सिंचनाच्या सुविधा, बंधारे बांधणे, वीज केंद्र उभारणे, सामाजिक एकोपा व शांतता ठेवणे, अशाप्रकारे सामाजिक स्वास्थ्य राखणे म्हणजे जनतेचा सर्वांगीण विकास होय. हे काम 20 वर्षे आंम्ही केले. मात्र, सध्या फक्त रस्त्यांसाठी आलेल्या निधीतून शासकीय निकष न पाळता कुमकुवत रस्ते तयार करणे व शासकीय निधीचा दुरुपयोग करणे म्हणजे विकास नव्हे, असा टोला यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील विरोधकांना लगावला.