लहू चव्हाण
पाचगणी : शौर्याची परंपरा असलेल्या, नरवीर तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी म्हणून बिरुदावली मिरवणाऱ्या गोडवली (ता.महाबळेश्वर) ग्रामपंचायतीच्या सरपंचाने शौर्य पदकधारक माजी सैनिकाला मालमत्ता कर वसूली व पाणीपट्टी संदर्भात नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.
देशाच्या संरक्षणासाठी सिमेवर बलिदान देणाऱ्या आजी माजी सैनिकांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी केलेली देशाची सेवा विचारात घेता सर्व आजी, माजी सैनिकांना भावनिक दिलासा देणे व त्यांचे मनोबल उंचावून त्यांना उचित सन्मान देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना मालमत्ता कर माफीचा निर्णय घेतलेला आहे.
मात्र गोडवली(ता.महाबळेश्वर) येथील माजी सुभेदार मेजर अंकुश चव्हाण यांना नोटीस पाठवून राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये हजर राहण्याचे फर्मान सोडल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.
खरे तर गावातील जवान हा गावासाठी भूषण समजला जातो. त्यांनी देशसेवेसाठी केलेल्या सर्वोत्तम त्यागासाठी त्यांच्याप्रती जनतेमध्ये आदरभाव असतो. त्यांना गावातील विविध कार्यक्रमांमध्ये मानाचे स्थान देण्यात येते. गोडवली ग्रामपंचायतीनेही सुभेदार चव्हाण यांच्या हस्ते या वर्षीच्या १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करताना या वीर जवानाचा सन्मान केला होता.
मात्र या जवानाला अवघ्या काही महिन्यातच ग्रामपंचायत व तेथील पदाधिकारी विसरले. एवढेच नव्हे तर त्यांना घरपट्टी भरण्याबाबत चक्क लोकअदालतीची नोटिस बजवण्यात आली. या जनतेच्या सेवकांचे बेगडी देशप्रेम व मतलबी राजकारणामुळे एका देशभक्त जवानाला मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. .