राजेंद्र गुंड – पाटील
माढा : कुर्डूवाडी ते टेंभुर्णी या मुख्य रस्त्याच्या शेजारील टेंभुर्णी एमआयडीसी हद्दीत असलेल्या जागेमध्ये विविध व्यावसायासाठी ७० नवीन गाळे बांधले आहेत. तालुक्यातील ज्या इच्छुक व्यावसायिकांना या ठिकाणी नवीन गाळे हवे आहेत. त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची व अटींची पूर्तता करून त्वरित गाळ्याचे बुकिंग करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा दूध उत्पादक व प्रकिया संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.
अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने कमी कालावधीत दूध संकलनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे संघाची योग्य दिशेने प्रगतीकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील जिल्हा दूध संघाच्या जागेत विविध व्यावसायिकांसाठी ७० नवीन गाळे बांधण्याचा निर्णय घेतला असून त्यास व्यावसायिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.
जिल्हा दूध उत्पादक व प्रकिया संघाच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर रणजितसिंह शिंदे यांनी दूध संघाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच दूध उत्पादक व प्रकिया संघ अडचणीत व तोट्यात गेल्याने अडचणीतून बाहेर काढण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.
दरम्यान, गाळ्यांचे बुकिंग सुरू झाल्यापासून अवघ्या दोन दिवसातच ३० गाळ्यांचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे गाळे बुकिंगला लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.