पुणे : पुण्यात दहशत माजविणाऱ्या कात्रजमधील तौसिफ ऊर्फ जमीर सय्यद ऊर्फ चूहा याच्यासह टोळीवर आंबेगाव पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यान्वये कारवाई केली आहे. टोळीप्रमुख तौसिफ जमीर सय्यद ऊर्फ चूहा (वय-२८, रा. संतोषनगर, कात्रज), सुरज राजेंद्र जाधव (वय-३५), मार्कस डेव्हिड इसार (वय-२९), कुणाल कमलेश जाधव (वय-२५) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी आरोपींनी अमली पदार्थांची खरेदी-विक्री, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, टोळीप्रमुख तौसीफ ऊर्फ चूहा याने त्याच्या अन्य साथीदारांसह स्वतः च्या नेतृत्वाखाली संघटितरीत्या टोळी तयार करून गंभीर गुन्हे केले. आरोपी हा तरुण मुलांना व्यसनाधीन करून त्यांना गुन्हेगारी टोळीमध्ये सामील करून गुन्हेगारी संघटना वाढविण्याचे काम करत आहे. त्यांच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाया करूनही त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने यांनी तयार केला.
परिमंडल-२ च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यामार्फत हा प्रस्ताव अप्पर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला. त्याला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मागर्दशनाखाली परवानगी देण्यात आली. आंबेगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, उपनिरीक्षक मोहन कळमकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत माने, शैलेंद्र साठे, अंमलदार ढमढेरे, नीलेश जमदाडे, सावंत, धोत्रे, विशाल वारुळे, स्वप्निल बांदल यांच्या पथकाने टोळीवर कारवाई केली. सहायक पोलिस आयुक्त राहुल आवारे पुढील तपास करत आहेत.
असं पडलं चूहा गँग नाव
तौसिफ जमीर सय्यद हा गंभीर गुन्हा केल्यावर शहरातील कात्रज, तळजाई अशा डोंगर असलेल्या भागात जाऊन कोठेही लपून बसायचा. तो सहसा सहजी पोलिसांना सापडायचा नाही. उंदरासारखा लपण्यास चाणाक्ष असल्याने त्याचे नाव चूहा असे पडले आहे.