लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये नावलौकिक मिळविले आहे. मागील दहा वर्षाच्या काळात शाळेच्या खेळाडूंनी तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर सुवर्ण कामगिरी केली आहे. यंदाही शाळेच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शन व निबंध लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून पुन्हा आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळे शाळेचे व विद्यार्थ्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे.
52 वे हवेली तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील गोल्डन सियारा पब्लिक स्कूल येथे मंगळवार (ता.24 व बुधवारी (ता.25) पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी भाऊसाहेब कारेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी विस्तार अधिकारी भरत इंदलकर, लोणी काळभोरचे केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप. हवेली तालुकाप्रमुख रवींद्र पानसरे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सुरेश कांचन. अजिंक्य फाउंडेशनचे सचिव अजिंक्य कांचन. गोल्डन सियारा पब्लिक स्कूलचे अध्यक्ष शैलेश चंद आदी मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शणासाठी हवेली तालुक्यातील अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. तर या प्रदर्शनात 106 प्रकल्प सादर करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचा विद्यार्थी राज प्रशांत काळभोर याने आर्मी फायटर हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच या प्रकल्पाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
विद्यालयात आठवी ब च्या वर्गात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी ओमकार बिक्कड याने निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याने लिहिलेल्या निबंधाला प्रथम क्रमाक मिळाला असून संपूर्ण हवेली तालुक्यात भारी ठरला आहे. राज काळभोर व ओमकार बिक्कड या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून शाळेच्या नावाचा तालुक्यात डंका वाजविला आहे. त्यामुळे विद्यालयाचे व विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, विजेत्या खेळाडूंना पर्यवेक्षक विलास शिंदे विज्ञान शिक्षक रोहन साठे श्रद्धा कदम व सर्व विज्ञान शिक्षकांचे व भाषा विषय शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तर यशस्वी खेळाडू व त्यांना मार्गदर्शक करणाऱ्या शिक्षकांचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी सत्कार करून अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.