भंडारा: परीक्षेत गुण वाढवून देण्याच्या मोबदल्यात प्राचार्याने विद्यार्थिनींकडे मर्जी राखण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी विद्यार्थिनींनी आक्रमक भूमिका घेत पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना विद्यालयात बोलावून घेतले आणि सर्वांसमक्ष प्राचार्यानी केलेल्या गैरकृत्याचा भंडाफोड केला. त्यानंतर पालक आणि सामाजिक कार्यकत्यांनी प्राचार्याला चांगलेच चोपले, पोलिसांनी वेळेत पोहोचून प्राचार्याला ताब्यात घेतले. या धक्कादायक प्रकाराने बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयात एएनएम आणि जीएनएमच्या २०० विद्यार्थिनी प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यालयाचे प्राचार्य किरण मुरकुट हे वर्षभरापूर्वी विद्यालयात रुजू झाले. मागील काही महिन्यांपासून एएनएमच्या प्रथम वर्षाला असलेल्या विद्यार्थिनींना प्राचार्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असून, प्राचार्य त्यांच्यासोबत गैरवर्तन करत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
एएनएमच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी मागील वर्षी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागली. या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची परीक्षा ५ व ६ नोव्हेंबर २०२४ रोजी घेण्यात आली. त्यानंतर ८ नोव्हेंबर रोजी प्राचार्य मुरकुट यांनी रात्री पावणेदहा ते पावणेअकरा वाजेदरम्यान दोन विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर पेपर कसे गेले? याबाबत विचारणा केली. त्यावर विद्यार्थिनींनी पेपर चांगले गेले. मात्र, निकालाची भीती वाटत असल्याचे प्राचार्याला सांगितले. त्यावर प्राचार्याने ‘तुम्ही माझी मर्जी राखणार असाल, तर मी तुम्हाला परीक्षेत पास होण्यासाठी मदत करू शकतो,’ असे स्पष्ट केले आणि ताबडतोब मेसेज डिलिट केला. मात्र, त्याचवेळी विद्यार्थिनींनी या मेसेजचा स्क्रीनशॉट काढून पालकांना याबाबत माहिती दिली. हा संतापजनक प्रकार कळताच पालकांनी प्राचार्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान पीडित विद्यार्थिनी, संतप्त पालक, सामाजिक कार्यकर्ते प्राचार्याच्या कक्षात धडकले व पीडित विद्यार्थिनींसोबत केलेल्या धक्कादायक प्रकाराबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली. तेव्हा प्राचार्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्राचार्याला चांगलाच चोप दिला. संतप्त पालकांनी भंडारा पोलीस ठाणे गाठून प्राचार्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही कॅमरे व सुरक्षारक्षक नाहीत
परिवर्या प्रशिक्षण केंद्र व संपूर्ण परिसरात २०० विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकला असताना या विद्यालयात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले नसून, सुरक्षारक्षकदेखील नाहीत. शासकीय विद्यालय असतानादेखील महिला सुरक्षेच्या दृष्टीने विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे का लावण्यात आले नाहीत? असा प्रश्न आता विचारला जात आहे.