नागपूर : समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या ५२१ किमी टप्प्याचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी नागपूर मधील मेट्रो मार्गिकेवर देखील प्रवास करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास ते नागपूरमध्ये उतरणार आहेत. सीताबर्डी येथील रेल्वे स्टेशनला जाऊन ‘वंदे ‘भारत’ रेल्वे सेवेची सुरुवात करणार आहेत.
त्यानंतर कस्तुरचंद पार्क ते खापरी या मार्गिकेवर प्रवास करणार आहेत. त्यानंतर ते समृद्धी महामार्गावर सुमारे १० किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने बैठकांचा धडाका लावला असून या दौऱ्याचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृशिकेनातून देखील विशेष सुरक्षा डाळ नागपूर येथे दाखल झाले असून पंतप्रधान मोदी जाणार असलेल्या मार्गांवर पाहणी सुरु आहे. पंतप्रधान मोदी यांचा मुख्य कार्यक्रम एम्स येथे होणार असल्याने येथे देखील तयारी सुरु करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या भोवती ४ हजार पोलिसांचे सुरक्षा कवच असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली असून ते शहरात सुमारे साडे तीन तास असणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यासाठी वाहतुकीत देखील मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून सामान्य प्रवाशांसाठी सकाळी साडे आठ ते ११ पर्यंत रेल्वे स्थानकाचे मुख्यद्वार बंद करण्यात येणार आहे.
तसेच आरबीआय ते एलआयसी मार्ग बंद सदर ते जयस्तंभ चौकापर्यंतचा रस्ता बंद करण्यात येणार असून रामझुल्यावरील रहदारी, लोहापूल ते मानस चौकांपर्यंतची वाहतूक व वर्धामार्गावरील उड्डाणपूलही बंद करण्यात येणार आहेत.