जिंती : ग्रामीण भागातील रुग्णांना लवकर आरोग्य सेवा मिळावी. कोणताही रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषदेने रुग्णांच्या सेवेसाठी जिंती (ता. करमाळा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला एक रुग्णवाहिका दिली आहे. यामुळे जिंती व परिसरातील 20 हून अधिक गावांना याचा फायदा होणार आहे. तर जिंती प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिका मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिंती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवार (ता.10) पासून रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी दाखल झाली आहे. रुग्णवाहिकेला सर्वात प्रथम हार घालण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी नारळ फोडून रुग्णवाहिकेचे स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्य सविता देवी राजेभोसले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश देवकर, वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, डॉ गोरख पोटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश घोरपडे, संदीप जगताप, अर्जुन वारगड, शहाजी ओंबासे, अशोक जगताप, निलेश थोरात, अक्षय धेंडे, शोयब शेख, प्रियंका धेंडे, आम्रपाली धेंडे, स्मिता धिवार, गौरी थोरात, सना सक्करगी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करमाळा तालुक्याचा पश्चिम भाग हा भीमा नदीलगत आहे. या भागात मोठ्या प्रमाणत शेती व्यवसाय केला जातो. जिंती येथे मकाई सहकारी साखर कारखाना आहे. त्यामुळे अनेक उसतोड कामगार वर्ग या ठिकाणी कामाच्या निमित्ताने येत असतो. त्याचबरोबर जिंती, टाकळी व कुंभारगाव परिसरात खाजगी शैक्षणिक संस्था आहेत. या परिसरात मोठ्या लोकसंख्येचे गाव, तसेच मोठी बाजारपेठ असलेली गावे आहेत.
या रस्त्यावर नेहमी छोटे मोठे अपघात होत असतात. जिंती आरोग्य केंद्रात सतत गर्दी असते. त्यामुळे या आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळावी. व रुग्णांना उपचार मिळावा. यासाठी नागरिकांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेने या आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका दिली आहे.
जिंती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुंभारगाव, टाकळी व जिंती ही तीन उपकेंद्र आहेत. या आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळाल्याने याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. या रुग्णवाहिकेमुळे वैद्यकीय उपचाराला गती मिळणार आहे. अपघातातील जखमींना, गर्भवती स्त्रीयांना, प्रसूतिपश्चात मातांना, नवजात शिशूंना व कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर सोलापूर सिव्हील हॉस्पिटलमधून औषधे, लस व वैद्यकीय उपकरणे आणण्यासाठी रुग्णवाहिका महत्वाची ठरणार आहे. तसेच ही रुग्णवाहिका जिंती व परिसरातील रुग्णांसाठी चिरंजीवी ठरणार आहे. त्यामुळे आता करमाळ्याचा पश्चिम भाग हा विकासाच्या दृष्टीकोनातून एक पाऊल पुढे पडले आहे.