पुणे : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. नवीन वर्ष सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आधीच महागाईने त्रस्त झालेल्या शेतकर्यांना नव्या वर्षात वाढणार्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. नैसर्गिक संकटांनी आधीच बेजार झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच आता वाढणार्या रासायनिक खतांमुळे शेतकर्यांना मोठा फटका बसणार आहे.
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतकर्यांना सतावत आहे. अशातच आता अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त आहेत, त्यातच आता उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये 200 ते 300 रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
शेतकर्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोयाबीनचे दर वाढतील या अपेक्षेने शेतकर्यांनी विक्री थांबवली होती. मात्र उलट दर कमी झाले आहेत. खत उत्पादक कंपन्यांनी 1 जानेवारी 2025 पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत.
दरम्यान, रासायनिक खतांचे दर अगोदरच जास्त आहेत. त्यात पुन्हा किमती वाढून शेतकर्यांना अधिकचा भुर्दंड बसणार आहे. तसेच शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. रासायनिक खतांचे वाढते दर पाहता भविष्यात शेतकर्यांना सेंद्रिय खताचा वापर वाढवावा लागणार आहे.
किती वाढल्यात किंमती?
- वाढीव दरानुसार डीएपी (डाय अमोनियम फॉस्फेट) खताची किंमत प्रतिपिशवी 1 हजार 350 रुपयांवरून 1 हजार 590 रुपये झाली आहे.
- टीएसपी 46 टक्के (ट्रिपल सुपर फॉस्फेट) खताची किंमत 1300 ऐवजी 1350 झाली आहे.
- 10:26:26 आणि 12:32:16 या खतांच्या किमती 1470 रुपयांवरून 1725 रुपये झाली आहे