पुणे: भारत निवडणूक आयोगाच्या मतदार यादी अद्ययावतीकरण कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या हस्ते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार या यादीवर नागरिकांनी २० ऑगस्टपर्यंत केलेले दावे, हरकतीवरील दुरुस्ती करण्याचे कामदेखील २९ ऑगस्ट अखेरपर्यंत निकाली काढण्याचे काम सुरू आहे.
सद्यःस्थितीला जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८४.३९ लाखांवर गेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुणे जिल्ह्याची मतदारसंख्या ही ८३ लाख ३८ हजार ७४७ एवढी होती. विधानसभा निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीनुसार जिल्हयाची मतदारसंख्या ही ८४ लाख ३९ हजार ७२९ झाली आहे. म्हणजेच लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल एक लाख ९८२ मतदार नव्याने समाविष्ट केले आहेत. प्रारूप यादीवर नागरिकांकडून दाखल दावे, हरकती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून २९ ऑगस्टपर्यंत निकाली काढले जातील. अंतिम मतदार यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दहा दिवस पूर्वीपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येईल. जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदारयादी अद्ययावतीकरण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रावर मतदारांची संख्या समान करण्यासाठी जिल्ह्यातील ६६२ मतदान केंद्रांवर काही मतदारांच्या मतदान केंद्रात बदल होणार आहे मतदारांना त्याच इमारतीतील दुसऱ्या मतदान खोलीत मतदान करता येणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सांगितले.
उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर म्हणाल्या, प्रारूप मतदार यादी कृषी महाविद्यालच्या शिरनामे सभागृह येथे ठेवली असून, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. प्रारूप मतदार यादीत जिल्ह्यात ८४१७ मतदान केंद्रावर एकूण ८४ लाख ३९ हजार ७२९ मतदार असून त्यापैकी ४४ लाख ३ हजार ३४४ पुरुष, ४० लाख ३५ हजार ६४० महिला आणि ७४५ तृतीयपंथीय मतदार आहेत. आतापर्यंत नाव, पत्ता दुरुस्ती, दुबार नावे, मयत आणि इतर दुरुस्त्यांसंदर्भात आलेल्या हरकतींवर कार्यवाही करण्याचे काम अंतिम टण्यात आहे