सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांचे दौरे वाढले असून यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशातच आता प्रणिती शिंदे या सोलापूरातील विविध गावांच्या भेटी घेत आहेत. त्याठिकाणी लोकांशी संवाद साधताना प्रणिती शिंदे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. केद्र सरकारने कोविड काळात लोकांना जबरदस्तीनं लस घ्यायला लावली. त्या लसीमुळे अनेकांना शुगर, बीपी आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला असा गंभीर आरोप प्रणिती शिंदेंनी केला आहे. प्रणिती शिंदे यांच्या विधानानं मोठी खळबळ उडाली आहे.
काय म्हणाल्या आमदार प्रणिती शिंदे
सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचं कंत्राट मिळालं. त्यातून सीरमने भाजपला १०० कोटी रुपये दिले. सीरमच्या कोविड लसीमुळे अनेकांना शुगर, बीपीचा त्रास झाला त्यामुळे मी लस घेतलीच नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले आहे. त्याचसोबत सरकारने लोकांना कोरोना लस घेण्यासाठी जबरदस्ती केली. त्यामुळे आज कुणाला काही ना काही दुखणे सुरू झाले आहे. ज्यांना काहीच नव्हतं अशांनाही रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार चालू झाले आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
म्हणून मी व्हॅक्सिन घेतले नाही : प्रणिती शिंदे
व्हॅक्सिन कशासाठी घ्यायचे, आपला एकमेव देश आहे, ज्याच्या व्हॅक्सिन प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो होता. कोरोनात किमान ५० लाख लोकांचा मृत्यू झाला. एकीकडे मृतदेहांचा खच पडत होता तर दुसरीकडे सरकार लस बनवणाऱ्या कंपनीला पैसे देत होती. नरेंद्र मोदी तुम्हाला थाळ्या वाजवायला सांगितल्या. पण तुम्ही थाळी वाजवताना सीरमकडून ते कोट्यवधी रुपये पक्षासाठी काढत होते. कोरोनात भाजपाने पैसे चोरले अशी टीका देखील आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.