मुंबई : बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात मोठी खळबळ उडाली. या हत्याप्रकरणाच्या राजकीय वादात मंत्री धनंजय मुंडे याचं नाव घेताना आमदार सुरेश धस यांनी तीन महिला कलाकारांची नावे घेत परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला होता.
यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेण्यात आलं होतं. त्यानंतर आज अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याकडून मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांना चांगलंच सुनावलं आहे. यावेळी प्राजक्ता माळीचं कंठ दाटून आल्याचं देखील पाहायला मिळालं.
अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाल्या, माझ्या भावाने सोशल मीडिया बंद केला, आई रात्रभर झोपली नाही, आमच्या कुटुंबाला मोठा त्रास होत आहे, गेल्या दीड महिन्यांपासून मी हे सर्व सहन करत होते. मात्र, एका लोकप्रतिनिधीने माझं नाव घेतल्यामुळे मी आज समोर येऊन बोलत आहे, असं म्हणत आमदार सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी, असं प्राजक्ता माळीने म्हटले आहे.
पुढे बोलताना म्हणाल्या, गेल्या दीड महिन्यांपासून हे सुरू आहे. माझ्यावर टीका होतेय, पण मी शांत बसते म्हणजे माझी मूकसंमती नाही. आमदार सुरेस धस यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी मी आज पत्रकार परिषद घेत आहे, असेही प्राजक्ता माळीने म्हटले आहे. माझा सुरेश धस यांना बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहात, आम्ही कलाकार आहोत. तुम्ही तुमचं राजकारण करा, पण आम्हाला कलाकारांना का मध्ये घेता असंही प्राजक्ता माळी यावेळी म्हणाली.
आपण माफी-बिफी मागत नसतो : सुरेश धस
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी केल्यानंतर आपण माफी-बिफी काही मागणार नाही. असं म्हणत धस यांनी माळी यांची मागणी फेटाळून लावली आहे. कृपया हा विषय संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन कुठूनही दुसरीकडे हिरो-हिरोईनकडे नेऊ नये, असे म्हणत मीडियालाही आमदार सुरेश धस यांनी विनंती केली.
सुरेश धस यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही : अमोल कोल्हे
याबाबत बोलताना अमोल कोल्हे म्हणाले कि, त्यांच्यासंदर्भात वाद होईल असं वाटले नव्हते. वाद निर्माण झाला नसता तर बरं झाल असत. आमदार सुरेश धस यांचे स्टेटमेंट हे इव्हेंटसंदर्भात होते. त्यांच्या विधानाला ट्विस्ट करण्याची गरज नाही. सुरेश धस यांच्याकडून शिंतोडे उडवायचा प्रयत्न झाला नाही. धस यांचे स्टेटमेंट हे क्लियर आहे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी सुरेश धस यांची बाजू घेतल्याचे दिसत आहे.
पुढे कोल्हे म्हणाले, एखाद्या मंत्र्याबाबत वारंवार आरोप होत असेल तर संशयाला जागा निर्माण होणारी आहे. हे संशयाचे धुके दूर करण्याचे काम मुख्यमंत्री यांनी करावे. सर्वसामान्य जनता जागी आहे हे मोर्चातून दिसून आलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सापडायला एवढे दिवस लागतायत याचा अर्थ कोणतरी पाठिशी आहे का,असा प्रश्न निर्माण होत आहे, असंही अमोल खोले यावेळी म्हणाले.