बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या गोरख धंद्याला चाप बसवावा, या मागणीसाठी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी सपना चौधरी, प्राजक्ता माळी आणि रश्मिका मंदाना यांचा उल्लेख केला आहे.
विटभट्ट्या, जमीन बळकावून त्यावर अवैध बांधकाम करून प्रचंड पैसा मिळवला जात आहे. आम्ही परळीत बघत असतो, रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे आणि याचा प्रसार देशभरात करावा. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, अशी खोचक टीका सुरेश धस यांनी केली आहे.
सुरेश धस म्हणाले, बीडमधील ‘आका’च्या बगलबच्च्यांनी जिल्ह्यातील तब्बल 1400 एकर गायरान जमिनीवर ताबा मिळवला आहे. शिरसाळा गावात गायरान जमिनींवर 600 वीटभट्ट्या आहेत. यापैकी 300 वीटभट्ट्या अनधिकृत आहेत. या वीटभट्ट्या ‘आका’च्या कार्यकर्त्यांच्या आहेत.
‘आका’चे कार्यकर्ते येथून काही अंतरावर असलेल्या 50 ते 60 एकर जमिनीवरील मुरुम काढून आणून दुसऱ्या जमिनीवर टाकतात. रसाळ आडनावाचा माणूस हे काम करतो. आकांनी या भागात 50 एकर जमीन घेतली आहे, पूर्ण बोगदा बुजवला आहे. गोरगरीब म्हणतात आमच्या जमिनीतून मुरून नेऊ नका. मात्र तरीसुद्धा गँग्ज ऑफ वासेपुरने जबरदस्तीने फिलिंग केले आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.