नवी दिल्ली: सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रासह विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर १ जानेवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या चौथ्या तिमाहीसाठी अपरिवर्तित राहतील. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली. ‘आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या तिमाहीसाठी विविध लहान बचत योजनांवरील व्याजदर आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी अधिसूचित दरापेक्षा अपरिवर्तित राहतील, असे त्यात म्हटले आहे.
सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत ठेवींवर ८.२ टक्के व्याजदर मिळेल. तिसऱ्या तिमाहीत तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील दर ७.१ टक्के राहील. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि पोस्ट ऑफिस बचत ठेव योजनांचे व्याजदरदेखील अनुक्रमे ७.१ टक्के आणि ४ टक्के कायम ठेवण्यात आले आहेत. किसान विकास पत्रावरील व्याजदर ७.५ टक्के असेल आणि गुंतवणूक ११५ महिन्यांत परिपक्व होईल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर जानेवारी-मार्च २०२५ या कालावधीसाठी ७.७ टक्के राहील. तिसऱ्या तिमाहीप्रमाणे मासिक उत्पन्न योजनेत गुंतवणुकीवर ७.४ टक्के व्याज मिळेल. गेल्या चार तिमाहीत व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारने आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीसाठी काही योजनांमध्ये शेवटचे बदल केले होते. सरकार दर तिमाहीत पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे चालवल्या जाणाऱ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदर अधिसूचित करते.