Politics : ठाणे महापालिकेतील एमआयएम नगरसेविका सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल तहसीलदार उमेश पाटील यांनी सादर केला आहे. या अहवालानंतर सहर शेख यांचे नगरसेविका पद धोक्यात आले असून, त्यांच्यासह त्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणात जावेद सिद्दीकी यांनी सहर शेख यांच्या वडील युनुस शेख यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रार केली होती. त्यानुसार प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली. तपासात सहर शेख या मूळच्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
तक्रारीनुसार, महाराष्ट्रात स्थलांतरित झाल्यानंतर युनुस शेख यांनी ‘नमुना 10’ लागू असताना ‘नमुना 8’ चा वापर करून इतर मागास प्रवर्गाचा (OBC) दाखला मिळवला. त्याच दाखल्याच्या आधारे सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी ठाणे महापालिका निवडणूक लढवून विजय मिळवला.

या प्रकरणाची सुनावणी 18 मार्च रोजी होणे अपेक्षित होते, मात्र युनुस शेख यांनी गैरहजेरी लावली. त्यानंतर 23 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचे अहवालात नमूद आहे. तसेच, ठाण्यातील रहिवासी असताना प्रमाणपत्र मुंबईतून का घेण्यात आले, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

तहसीलदारांच्या अहवालानुसार, उपविभागीय अधिकारी ठाणे आणि कोकण विभागीय जात पडताळणी समितीकडे पुढील कारवाईसाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. कागदपत्रांमध्ये चुकीची माहिती किंवा फेरफार केल्याच्या संशयावरून कायदेशीर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.







