बापू मुळीक / सासवड : महाराष्ट्राचे शिल्पकार व माजी मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण हे राजकारणी असूनही उत्तम साहित्यिक होते. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र साहित्य क्षेत्रातील अप्रतिम आत्मचरित्र म्हणून उल्लेखले जाते. राजकारणी असूनही साहित्य, कला, संगीत या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे काम करणारे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदरचे चे अध्यक्ष विजय कोलते यांचे कौतुक करावेसे वाटते. आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या साहित्याची सेवा विचारात घेऊन अतिशय महत्त्वाचा “काव्यमित्र” पुरस्कार त्यांना देताना मला आनंद होत आहे. असे उद्गार साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवयित्री व लेखक असावरी काकडे यांनी व्यक्त केले.
कविता व काव्य क्षेत्रात गेली ५३ वर्षे सातत्याने काम करणाऱ्या “काव्यशिल्प” या संस्थेच्या वतीने “काव्यमित्र” पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर अध्यासन भवन, कर्वे रोड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष स्वाती यादव होत्या. समारंभासाठी जयश्री चोले, विनोदी कवी बंडा जोशी, राज्याचे माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, म.सा.प.सासवड शाखेचे कार्याध्यक्ष सतीश पाटील, ज्येष्ठ लेखक पुंडलिक लव्हे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उत्तराच्या भाषणात विजय कोलते म्हणाले की, सासवड या आचार्य अत्रे यांच्या जन्म गावी सन १९९८ सालापासून ४१ कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. त्यामुळे हा पुरस्कार मला मिळाला आहे. तो मी नम्रपणे स्वीकारत आहे.