पुणे : शहरात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. या सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात २५ ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हच्या संदर्भात विशेष मोहीम राबवण्यात आली होती . यामध्ये २७२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
धुळवडीच्या पार्श्वभूमीवर सकाळी सात ते रात्री दहापर्यंत तब्बल २७२ तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयातील २५ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.सांगवी वाहतूक विभाग ते तळवडे, देहूरोड, तळेगाव, रावेत, हिंजवडी, वाकड, भोसरी, चिंचवड, अशा प्रत्येक ठिकाणी ही विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.
होळीच्या दुसर्या दिवशी शहरात मोठया उत्साहात धुळवड साजरी केली जाते. उत्तर भारतीयांच्या वाढत्या प्रभावामुळे धुलवडीच्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यावेळी अनेक जण भांग पिणे, दारु पिऊन रंग एकमेकांवर उधळतात. तसेच ट्रिपल सीट बसून वाहनावरुन वेगाने जात असतात. अशा तरुणाईकडून अपघात होऊ नयेत, यासाठी शहर पोलीस दलाने विशेष मोहिम आखली होती. या विशेष मोहिमेतून तब्बल 272 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान २७२ जणांवरील खटले पुढील काही दिवसांमध्ये कोर्टात पाठवले जातील. पुढील कारवाई कोर्टातून होईल अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली आहे.