हिंगोली : शहरातील प्रगतीनगर भागात पोलिस कर्मचाऱ्यानेच पत्नीवर गोळी झाडून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी 25 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत दाखल झाले असून, खूनाचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला रात्री उशिरा अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील गोळीबार करणारा आरोपी पोलिस कर्मचारी आहे. विलास हा हिंगोली तालुक्यातील गाडीबोरी येथील रहिवासी आहे. आरोपी हा २०१४ मध्ये पोलिस दलात भरती झाला होता. त्यानंतर तो मुख्यालयात त्याच्या कर्तव्यावर होता. मागील एका वर्षापूर्वीच त्याची वसमत शहर पोलिस ठाण्यात बदली झाली होती. बुधवारी सकाळी तो पोलिस ठाण्यात आला होता, अशी माहिती वसमत शहर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, वसमत पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी विलास मुकाडे याने पिस्टलमधून त्याची पत्नी मयुरी विलास मुकाडे यांच्यावर गोळी झाडली आहे. त्यानंतर सासू वंदना धनवे तसेच मेहुणा योगेश धनवे यांच्यावर देखील यावेळी गोळीबार करण्यात आला आहे. त्यावेळी वंदना व योगेश गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, त्याची पत्नी मयुरी यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरी मुकाडे यांचा मृतदेह घरात पडलेला दिसून आला. वंदना धनवे व योगेश धनवे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर विलास हा पळून गेला असता पोलिसांनी रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस सर्व बाजूंनी माहिती घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, पोलिस निरीक्षक शामराव डोंगरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह हिंगोली ग्रामीण पोलिस कर्मचाऱ्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.