पिंपरी (पुणे) : गेम पार्लरच्या नावावर जुगार चालवणाऱ्यावर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दीड लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सुशील सूर्यकांत आवटे (वय २९), विजय दामोदर बरगट (वय ४०), ज्ञानेश्वर मारुती साळुंके (वय ३८) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल समीर काळे यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई दिघी-आळंदी रोडवर रॉयल व्हिडीओ गेम पार्लर येथे करण्यात आली. रॉयल व्हिडीओ गेम पार्लरमध्ये गेमच्या मशीनवरील आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून पाहणी केली असता त्याठिकाणी जुगार सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी करत एक लाख ४८ हजार ८५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.