धुळे : जिल्हा पोलीस दलातील 2 पोलिसांनी जीएसटी अधिकारी भासवून नागरिकांना लुटल्याची बाब समोर आली आहे. बिपिन पाटील आणि इमरान शेख हे दोन कर्मचारी महामार्गावर जीएसटी अधिकारी भासवून व्यापारी आणि ट्रक चालकांची लूट करायचे. याप्रकरणी काश्मीर सिंग बाजवा यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 4 लाखांची माया पोलिसांनी जमा केली होती.
या तक्रारीनंतर कर्मचारी बिपीन पाटील आणि इमरान शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू केला. सुरुवातीला नागरिकांना 73 लाखांचा गंडा घातल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी चार कोटींचा गंडा घातल्याची कबुली दिली. या प्रकरणी एका संस्थेतील 16 बँक खाती पोलिसांकडून सील करण्यात आली आहे.
या प्रकरणातील पोलीस कर्मचारी बिपीन पाटील इमरान शेख आणि त्यांचे 2 साथीदार यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ही बँक अकाउंटमध्ये गुगल पे आणि फोन पे द्वारे ट्रान्सफर करण्यात येत होती. या प्रकरणातील संशयित पोलीस कर्मचारी बिपीन पाटील, इमरान शेख यांना धुळे न्यायालयात हजर केल्यावर त्यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात आली.
तपासादरम्यान, 1 लाख 30 हजार रूपये ही रक्कम गुगल पे वरून बिपीन पाटील यांची नाशिक येथील त्याची बहिण स्वाती रोशन पाटील हिच्या खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली. गोपनीयता राहावी म्हणून सर्व संभाषण व्हॉट्सअॅपद्वारे करण्यात आले होते. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.