कर्जत : नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राशीन (ता.कर्जत) येथील जगदंबा (यमाई) देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. मात्र दर्शनासाठी आलेल्या लाखोंच्या गर्दीला सुलभपणे दर्शन घडवणारी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची संकल्पना खरोखरच भाविकांना भावत आहे. जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक यांना विश्वासात घेऊन गेल्या वर्षीपासून यादव यांनी केलेल्या नियोजनामुळे भाविकांना सुलभ आणि सुरक्षित दर्शन घडत आहे.
कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादव यांच्या संकल्पनेतुन जगदंबा देवी मंदिर परिसरात जगदंबा ट्रस्टकडून नियोजित बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून दर्शनासाठी आत येण्यासाठी एक व दर्शन करून मंदिराच्या बाजूने वाहन तळाकडे बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग असे दर्शनबारीचे एका रेषेत लोखंडी बॅरिकेटिंगचे नियोजन करण्यात आले आहे.राज्यभरातुन येणाऱ्या चारचाकी वाहनांसाठी म्हणजेच ट्राफिक नियंत्रणासाठी मंदिराच्या दक्षिण व उत्तर गेटच्या ठिकाणी सर्व वाहनांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
नवरात्रोत्सवाच्या काळात अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आपल्या व्यावसायाकरता अतिक्रमण करतात मात्र पोलीस यंत्रणेने शिस्तीचे दर्शन घडवून अतिक्रमणावर नियंत्रण मिळवले आहे. संपूर्ण रस्ता मोकळा असल्याने ये- जा करणाऱ्या भाविकांना सुरक्षित वाटू लागले आहे.
राज्यभरातून आलेल्या भाविकांना दर्शनासाठी मुख्य गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देवीच्या मुखवट्याचे अगदी जवळून दर्शन घेण्याचे भाग्य लाभत आहे. दर्शनरांग असल्याने कुणाचाही हस्तक्षेप होत नाही. त्यामुळे भाविकांना सुलभ दर्शन घडत आहे महिलांची छेडछाड नाही, वयस्कर भाविक देखील रांगेतून दर्शन घेत आहेत आणि विशेष म्हणजे गर्दी असतानाही कमी वेळेत दर्शन घेण्याची संधी उपलब्ध होत आहे.
नवरात्रोत्सवात अगदी पहिल्या दिवसापासून सुरू झालेला दिनक्रम शेवटच्या दिवसापर्यंत शिस्तबद्ध सुरू असल्याने राशीनच्या जगदंबा देवीच्या भक्तांमध्ये उत्साह वाढत आहे. तालुक्यातूनच नव्हे तर अनेक जिल्ह्यातील नवरात्र मंडळे ज्योत आणण्यासाठी देवीच्या दारात येत असतात त्यांनीही या वर्षीच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. प्रत्येक भाविकांवर पोलीस कर्मचारी, होमगार्ड लक्ष ठेऊन आहेत. त्यामुळे चोरी करणाऱ्या चोरट्यांना चोरी करण्यास संधी मिळत नाही. जरी मंदिर परिसरात काही अनुचित प्रकार घडला तर पोलिस तात्काळ दखल घेत आहेत.
दरम्यान, राशीनच्या मंदिर परीसरात दर्शनासाठी करण्यात आलेल्या नियोजनाचे व कर्जत पोलिसांनी घेतलेल्या परिश्रमाचे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. सातव्या माळेचा रविवारचा दिवस रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा ठरला आहे. गर्दी असूनही दर्शन होत आहे या भावनेतून भाविकांची गर्दी उसळली होती. काही वेळ पोलिसांनाही गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कसरत करावी लागली.मात्र यंदाचा नवरात्रोत्सव मनाला आनंद, ऊर्जा आणि उत्साह देणारा ठरला हे मात्र खरे!
याबाबत बोलताना जिंती (ता. करमाळा) येथील भाविक विशाल कदम म्हणाले कि, राशीन येथील नवरात्री उत्सव डोळ्यांचे पारणे फेडणारा असतो. तालुक्यातील आणि राज्यभरातील लाखो भाविक नवरात्रीला येत असतात. गर्दी असल्याने सुरक्षित वाटत नाही.चोऱ्या होण्याची भीती वाटते, परंतु कर्जत पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे सर्वांना सुलभ दर्शन झाले. कर्जत पोलिसांनी घेतलेले परिश्रम आणि केलेले नियोजन वाखाणण्याजोगे आहे.” त्याबद्दल मी सर्व पोलिसांचे आभार मानतो.
जगदंबा देवी देवस्थान पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष निळकंठ देशमुख म्हणाले, “यंदाचा नवरात्रोत्सव उत्साहात आणि नियोजनबद्द पार पाडण्यासाठी पुर्व नियोजन बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार पोलीस यंत्रणेने अतिशय चोख नियोजन केले. कुठेही कुणाला गालबोट लागले नाही.दर्शनरांगेमुळे सर्वांना मनमोकळे दर्शन होत आहे. सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्रात भाविकांना प्रसाद म्हणून खिचडी देण्यात येत आहे.सर्वांच्या चेहऱ्यावर खुप उत्साह आहे.”