नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल विजय रमेश चव्हाण (४२) यांची बुधवारी पहाटे गळा दाबून अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. चव्हाण यांचा रेल्वेखाली मृत्यू झाल्याचे भासवण्यासाठी या दोघा मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकांदरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिला होता. मात्र, जागरूक मोटरमनने पोलिसांना खबर दिल्यामुळे हा कट उघडकीस आला.
वाशी रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी दोघा अज्ञात मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. घणसोली येथे राहणारे विजय चव्हाण यांची मंगळवारी साप्ताहिक सुट्टी होती. बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास दोघा व्यक्तींनी त्यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकांदरम्यान ठाण्याहून वाशीकडे जाणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले होते. आपल्या लोकलसमोर कुणाला तरी ढकलल्याचे लक्षात आल्यावर या लोकलच्या मोटरमनने आरपीएफ आणि वाशी रेल्वे पोलिसांना लगेचच ही घटना कळवली.
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर, गाडीखाली आलेली मृत व्यक्ती हे पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल विजय चव्हाण असल्याची ओळख पटली. तसेच त्यांचा गळा दाबल्याच्या खुणा आढळून आल्या. शवविच्छेदन केले असता, चव्हाण यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. मारेकऱ्यांनी चव्हाण यांची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्यांचा अपघाती मृत्यू भासवण्यासाठी त्यांना धावत्या लोकलसमोर ढकलून दिले होते. वाशी रेल्वे पोलीस या मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.