पुणे : गाड्यांवर राजकीय नेत्यांचे फोटो किंवा सरकारी चिन्ह लावून मिरवणाऱ्यांवर आता पोलिसांची कडक नजर असणार आहे. व्हीआयपी ट्रीटमेंट मिळवणे आणि पोलिसांच्या कारवाईपासून वाचणे, या उद्देशाने अनेकजण आपल्या गाड्यांवर आमदारांचे फोटो किंवा अशोकस्तंभ असलेले लोगो वापरत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा प्रकारचा वापर करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या चालकांचा माज उतरवण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे.या कारवाईची सुरुवात पिंपरी-चिंचवड शहरातून झाली आहे.

वाहतूक पोलिसांनी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात तपासणी मोहीम राबवून बीएमडब्ल्यू, थार,फॉर्च्युनर आणि डिफेंडर यांसारख्या महागड्या गाड्यांना थांबवले. या गाड्यांच्या पुढील काचेवर आणि मागच्या बाजूला आमदारांचे लोगो किंवा अशोकस्तंभ बेकायदेशीरपणे लावल्याचे पोलिसांना आढळून आले.

जेव्हा पोलिसांनी चालकांकडे या बिल्ल्यांबाबत आणि अधिकृत परवानगीच्या कागदपत्रांची चौकशी केली, तेव्हा त्यांच्याकडे कोणतेही वैध पुरावे नव्हते. केवळ टोल नाक्यांवर सूट मिळवणे, पोलिसांच्या कारवाईतून सुटणे आणि समाजात स्वतःचा रुबाब दाखवणे याच मुख्य हेतूने हे चिन्ह लावल्याचे समोर आले आहे.

रस्त्यावर गाड्या चालवताना वाहतुकीचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात. लोकप्रतिनिधींच्या नावाचा किंवा सरकारी चिन्हांचा असा गैरवापर करून स्वतःचा फायदा उकळणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यामुळेच अशा गाड्यांवर आता मोटार वाहन कायद्यानुसार थेट दंडात्मक कारवाई केली जात आहे. भविष्यात अशा प्रकारचा गैरवापर टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार आहे.







