पुणे : पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या आंदोलनाविरोधात आता पुणे पोलिसांनी आपली कारवाई अधिक कडक केली आहे.

आंदोलनस्थळी येणाऱ्या नेत्यांची भाषणे विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसावीत यासाठी एस. एम. जोशी पुलाच्या परिसरात 2 मोठ्या LED स्क्रीन लावण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी गर्दी वाढल्यानंतर या स्क्रीनचा वापर केला जात होता. मात्र, पोलिसांच्या माहितीनुसार या स्क्रीन कोणत्याही परवानगीशिवाय लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुणे पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत या दोन्ही LED स्क्रीन तात्काळ हटवल्या.या आंदोलनाला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 29 क्लास व अभ्यासिका चालक तसेच 51 विद्यार्थ्यांसह एकूण 80 हून अधिक जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

या सर्व बाबींच्या आधारे संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही आंदोलनाला परवानगी नसल्याचे स्पष्ट करत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविला आहे.पोलिसांच्या या कठोर भूमिकेमुळे एमपीएससी आंदोलकांवरील प्रशासकीय दबाव चांगलाच वाढला आहे.

पुणे पोलिसांनी हे संपूर्ण आंदोलन विनापरवाना आणि बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले आहे. शहरातील 3 वेगवेगळ्या ठिकाणी हे आंदोलन सुरू असून, पोलिसांनी आंदोलनस्थळाचे चित्रीकरण केले आहे. तसेच आयोजकांना आधी दिलेल्या सूचना आणि त्यानंतरही सुरू राहिलेल्या हालचालींची माहिती आता पोलीस गोळा करत आहेत.







