पुणे : पुण्यामध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दररोज काही ना काही प्रकरणे समोर येत आहेत. अशातच आता पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विसापूर किल्ला परिसरात आई-वडिलांसोबत दुकानात असलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलीसाने लैंगिक अत्याचार केला आहे. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना बुधवारी (दि.25) घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीसांनी संबंधित पोलीसाला अटक केली आहे.
सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या पोलीसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस
ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलीसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने पर्यटन फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलीसांच्या हद्दीत येणा-या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तासाठी उपस्थित होता. त्यादरम्यान विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी या पीडित मुलीच्या आईवडिलांची टपरी आहे ती तिथे खेळत होती. त्यावेळी पोलीस सचिन सस्ते याने चिमुकलीला चॉकलेटचा आमिष दाखवून आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा घडलेला सर्व प्रकार मुलीने तिच्या पालकांना सांगितला.
हे प्रकरण समजताच मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलीसात धाव घेत आरोपी पोलीसांवर गुन्हा दाखल केला. तसेच लोणावळा ग्रामीण पोलीसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.