पुणे : मावस बहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील पसार झालेल्या तीन जणांना पोलीसांनी अकलूज येथून ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (ता. 19) रात्री बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम छत्रपती रस्त्यावर घडली होती. याप्रकरणातील आरोपींना पोलीसांनी 12 तासात अटक केली आहे.
अनिकेत सदाशिव गजाकस (वय- 23, रा. देसाई ईस्टेट बारामती, ता. बारामती) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर याप्रकरणी नंदकिशोर पंजाबराव अंभोरे (वय-19, रा. प्रगतीनगर ता. बारामती), महेश नंदकुमार खंडाळे (वय-21, रा. तांदुळवाडी रोड जिजामातानगर), व संग्राम दत्तात्रय खंडाळे (वय-21, रा. तांदुळवाडी ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकं प्रकरण काय?
बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम छत्रपती रस्त्यावर गुरुवारी (ता. 19) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास प्रगतीनगर येथील क्रियेटीव्ह अॅकॅडमी कडुन टी.सी. कॉलेजकडे जाणाऱ्या रोडवर अनिकेत हा नंदकिशोर अंभोरे याची मावस बहीण वैष्णवी शेवाळे हीच्याशी बोलत असल्याच्या कारणावरुन नंदकिशोरअंभोरे, महेश खंडाळे, संग्राम खंडाळे यांनी मिळुन भाऊ अनिकेत गजाकस यास गळ्यावर, हातावर, चेह-यावर धारधार शस्त्राने वार करुन त्यास जीवे ठार मारले. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते.
याप्रकरणी पोलीसांनी आरोपींचा शोध घेतला असता खून प्रकरणानंतर बारा तासात अकलूज परिसरातून त्यांना अटक करण्यात आली. तसेच यावेळी आरोपींकडून दुचाकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.