पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक १२ आणि पेठ क्रमांक ३०-३२ येथे सर्वांसाठी परवडणारी घरे योजनेंतर्गत सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २ हजार ८६४ नागरिकांनी अनामत रक्कम जमा केली आहे. नागरिकांकडून पीएमआरडीएच्या सदनिकांना वाढता प्रतिसाद मिळत असून येत्या रविवार (दि. १५) पर्यंतच अर्ज करता येणार आहे.
पीएमआरडीएच्या पेठ क्रमांक १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे. यासह पेठ क्रमांक ३०-३२ येथे ईडब्ल्यूएस (१ आरके) प्रवर्गात ३४७ तसेच एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १ हजार ३३७ शिल्लक असलेल्या सदनिकांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
यासाठी १२ ऑक्टोबरपासून अर्ज मागविण्यात येत आहे. यात शुक्रवारी (दि. १३) दुपारपर्यंत २ हजार ८६४ जणांनी अनामत रक्कम भरली आहे. या सदनिकांसाठी रविवार (दि. १५) पर्यंतच अर्ज भरता येणार आहे. इच्छुक नागरिकांनी पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे.