पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) प्रशासनाकडून उत्पन्न वाढीसाठी वाहक, चालक आणि डेपो प्रमुखांनी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एखाद्या मार्गावर अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न आल्यास त्याचे कारण प्रत्येक महिन्याला मुख्य वाहतूक व्यवस्थापकांना द्यावे लागणार आहे. मार्गावरील उत्पन्न खूपच कमी झाल्यास संबंधित वाहक व चालकांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कामचुकार पीएमपी चालक व वाहकांचे धाबे दणाणले आहेत.
पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांनी सर्व डेपो प्रमुख आणि वाहक चालकांना उत्पन्न वाढीसाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी वगळता इतर दिवशी अपेक्षित उत्पन्न कमी आल्यास त्यांना डेपो प्रमुखांनी चालक व वाहकांना समक्ष बोलवून घ्यावे. त्यांना मार्गावर उत्पन्न कमी का येत आहे, याची विचारणा करावी. तसेच, उत्पन्न वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत मार्गदर्शन करावे, अशा सूचना वाहतूक व्यवस्थापकांनी केल्या आहेत. तसेच, ज्या मार्गावर अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी उत्पन्न प्राप्त होईल, अशा चालक-वाहक सेवकांवर प्रशासकीय कारवाई करावी. त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीत पीएमपी १६५० बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. या बसमधून दिवसाला साधारण ११ ते १२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामधून दीड कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पीएमपीच्या उत्पन्नामध्ये घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संचलन तूट वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी पीएमपीकडून उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पीएमपीला काही महत्वाच्या मार्गावर खूप चांगले उत्पन्न मिळते. त्यातील बहुतांश मार्ग हे दीर्घ टप्प्याचे आहेत. मात्र, त्या मार्गावर देखील उत्पन्नामध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पीएमपीच्या अध्यक्षांनी उत्पन्न कमी होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.