पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक बस सेवा पीएमपीद्वारे पुरविली जाते. या दोन शहरांमधून दररोज किमान 10 ते 12 लाख प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. दरम्यान, दरवर्षी पीएमपीचा तोटा वाढत असल्याने त्याचा भुर्दंड पुणे महापालिकेलाही सहन करावा लागत आहे. पीएमपीला होणा-या तोट्यातील 60 टक्के रक्कमेची भरपाई महापालिका देते. ही रक्कम दरवर्षी कोट्यावधी रुपयांनी वाढत आहे. त्यामुळे महापालिकेकडून पीएमपीने तिकीट दरवाढ केली जावी, अशी मागणी केली जाणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले आहे.
नागरिकांना कमी खर्चाच एका भागातून दुस-या भागात जाता यावे, यासाठी पीएमपीएमएल बस सेवा पुरविते. शहरातील विविध भागांमध्ये पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत पीएमपीच्या बस धावत असतात. नागरिकांना सेवा देताना पीएमपीएमएल चा खर्च वाढत आहे.
पीएमपीचे गेल्या दहा वर्षांत अनेक वेळा तिकीट दर वाढवण्याचे प्रयत्न झाले. मात्र, नागरिकांनी विरोध केल्यानंतर तो मागे घेण्यात आला. मात्र, आता पीएमपीची यंदाची तूट भरून काढण्यासाठी तिकीट दरात वाढ करण्याचा विचार केला जात असल्याचे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये पीएमपीची बससेवा पुरविली जाते. पीएमपीच्या ताफ्यात 2100 बस असून त्यापैकी सुमारे 450 नादुरुस्त व अन्य कारणांनी बस डेपोमध्ये असतात. तर सुमारे 1650 बस या रोज प्रवासी सेवेसाठी उपलब्ध असतात. ही बस संख्या अपुरी असली तरी रोज सुमारे 10 ते 12 लाख प्रवाशांना प्रवासासाठी पीएमपीच्या आधार महत्तावाचा आहे.
गेल्या 10 वर्षातील पीएमपीचा तोटा.. (कोटींमध्ये)
2014-15 – 167 कोटी
2015-16 – 151 कोटी
2016-17 – 210 कोटी
2017-18 – 204 कोटी
2018-19 – 247 कोटी
2019-20 – 315 कोटी
2020-21 – 494 कोटी
2021-22 – 718 कोटी
2022-23 – 646 कोटी
2023-24 – 706 कोटी