पिंपरी चिंचवड : संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी (Pimpri-Chinchwad News) आणि सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर (Nakul Bhoir) यांच्या खुनाच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात पोलिसांनी भोईर यांच्या पत्नी चैतालीच्या प्रियकराला अटक केली आहे. नकुल भोईर यांचा खून त्यांच्या पत्नीनेच केला होता, आणि आता तिच्या प्रियकरालाही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक केली असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आज पिंपरी चिंचवड पोलिसांनी चैताली भोईरचा प्रियकर सिद्धार्थ पवार (21 वर्षे) याला अटक केली. सिद्धार्थ पवार हा देखील पिंपरी चिंचवड परिसरात राहतो. चैताली आणि सिद्धार्थ यांचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध सुरू होते. या नात्यामुळेच नकुल भोईर आणि त्यांच्या पत्नीमध्ये सतत वाद होत असत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नकुल आनंद भोईर (40 वर्षे) यांची 24 नोव्हेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. मध्यरात्री अडीच ते पावणे तीनच्या दरम्यान ही घटना घडली. नकुल आणि चैताली हे दोघे चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माणिक कॉलनी येथे राहत होते. नकुल यांना त्यांच्या पत्नी चैतालीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत.
24 नोव्हेंबरच्या रात्रीही चैताली आणि नकुल यांच्यात जोरदार वाद झाला. रागाच्या भरात चैतालीने ओढणीने गळा आवळून नकुलचा खून केला. घटनेनंतर पोलिसांनी चैतालीला अटक करून चौकशी सुरू केली होती. नकुल भोईर हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड या दोन्ही संघटनांमध्ये सक्रिय पदाधिकारी होते.
तपासादरम्यान पोलिसांना संशय आला की, चैतालीने एकटीने हा खून केला नसावा. तिच्या हालचाली आणि तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली असता, तिने अखेर कबुली दिली की तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार या खुनात सहभागी होता. दोघांनी मिळून पूर्वनियोजित कट रचत नकुल भोईरची हत्या केली. सिद्धार्थने चैतालीला मदत केली आणि नंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी सिद्धार्थलाही बेड्या ठोकल्या असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







