पुणे : प्राणी संग्राहालयातील सापांना खाद्य म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उंदीर खरेदी करण्यासाठी ११ लाख ७३ हजारांची तरतूद केली आहे. यामुळे पशुवैद्यकीय विभागाचा एक उंदीर १६३ रुपयांना खरेदी करण्यात येणार आहे.
शहरामध्ये महानगरपालिकेचे एकमेव प्राणी संग्रहालय आहे. मात्र, ते गेल्या सात वर्षांपासून सुशोभीकरण आणि नुतनीकरण करण्यासाठी बंद असून प्राणिसंग्रहालयाला टाळे असल्याने पर्यटन बंद आहे. तेथे असलेल्या प्राण्यांना संग्रहालयातील एका कोपऱ्यामध्ये पिंजऱ्यात तात्पुरत्या स्वरूपात ठेवण्यात आले आहे.
त्यांना दररोज खाद्य म्हणून भाजीपाला, फळे, मांस, उंदीर असे खाद्य दिले जाते. सद्य:स्थितीत संग्रहालयामध्ये ५५ विषारी, बिनविषारी साप आहेत. त्यांना खाण्यासाठी दररोज उंदीर दिले जातात.
दरम्यान, हे उंदीर पुरविण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने १६५ रुपये प्रतिउंदीर दराने निविदा काढली होती. त्यासाठी तीन निविदा प्राप्त झाल्या. त्यात मे. सॅम एंटरप्रायजेसची दोन रुपये कमी दराची १६३ रुपयांची निविदा पात्र ठरली.
दोन वर्षांसाठी उंदराचा खर्च ११ लाख ७३ हजार ६०० रुपये इतका आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली आहे.