पिंपरी : पिंपरी-चिंचवडवर शहरावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे.शहरात सार्वजनिक ठिकाणी राज्य शासनाकडून एक हजार ४०८ आणि स्मार्ट सिटी अंतर्गत तीन हजार ५०० असे चार हजार ९०८ बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांचा वाहतूक नियोजन, गुन्हेगारी प्रतिबंध यासाठी वापर होत आहे. शहरातील आस्थापनांनी कार्यालये, दुकानांसमोर एक कॅमेरा रस्त्याच्या दिशेने बसवावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांकडून घरे, कार्यालये अथवा दुकानांपुरता सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येतो. अनेक जण रस्त्याच्या दिशेने कॅमेरा लावणे टाळतात. त्यामुळे एखाद्या ठिकाणी चोरी झाल्यास चोरीच्या घटनेचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागते. मात्र, चोर कोणत्या दिशेने आले आणि गेले, याबाब माहिती मिळत नाही. रस्त्याच्या दिशेने कॅमेरा आहे का, हे पोलिसांना आधी शोधावे लागते. जिथे कॅमेरा असेल तिथून चित्रीकरण मिळवून पुढील कारवाई केली जाते. यामध्ये पोलिसांचा वेळ वाया जातो. तर, आरोपींना पळून जाण्यासाठी वेळ मिळतो. रस्त्याच्या दिशेने कॅमेरे बसविल्यास रस्त्यावर कोणतीही अनुचित घटना घडल्यास आरोपीची ओळख पटविण्यासाठी मदत होण्याची शक्यता असते, असे पोलिसांनी सांगितले.
‘सीसीटीव्ही’द्वारे गंभीर गुन्ह्यांची उकल..
अनेक गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. इतर राज्यांतून शहरात येऊन एटीएम फोडणाऱ्या टोळीला सीसीटीव्ही चित्रीकरणावरून पोलिसांनी अटक केली होती. चिखलीमध्ये तीन वर्षांच्या मुलीचे नरबळीसाठी अपहरण झाले होते. त्या गुन्ह्यातील आरोपींनादेखील केवळ सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अवघ्या काही तासांत अटक केली होती. भोसरी येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गोव्याला पळून जात असलेल्या आरोपीलादेखील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे अटक करण्यात आली होती.