Pimpari News : पिंपरी : एका महिलेने भाजी विक्रेत्याकडून ४० हजार रुपयांची खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या महिलेने ‘तू रस्त्याच्या कडेला भाजीचा धंदा करतोस याची तक्रार पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे करेन’, अशी धमकी दिली. त्यानंतर खंडणी वसूल करण्यात आली.
मोहननगर येथे हा प्रकार ऑगस्ट २०२३ ते ३० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत घडला. याप्रकरणी राजेश अशोक रांगोळे (वय २५, रा. सुसगाव) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी खंडणी वसूल करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राजेश रांगोळे यांना संशयित महिलेने भाजीपाला विक्रीच्या हातगाडीवर येऊन तसेच फोन करून खंडणीची मागणी केली. भाजीपाल्याची गाडी फिर्यादी हे फूटपाथवर लावतात, त्यामुळे त्यांची तक्रार महापालिकेकडे करण्याची धमकी संशयित महिलेने दिली. याशिवाय, दररोज ५०० रुपये द्यायचे. तरच येथे हातगाडी लावायची. अन्यथा तुझ्याकडे बघते, अशी धमकी दिली.