भिगवण : मराठा आरक्षणासाठी जालना या ठिकाणी बसलेल्या आंदोलकांवर जो हल्ला करून लाठीचार्ज करण्यात आला त्यात महिलांनवरही कुठलीच दया न दाखविता ज्या प्रकारे अमानुष मारहाण करण्यात आली. त्याचा जाहीर निषेध म्हणून भिगवण (ता. इंदापूर) येथे पुणे सोलापूर महामार्गावरती रविवारी (ता.३) सर्वधर्मीय रास्ता रोको पाहायला मिळाला.
संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेला ‛एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ’ या अभंगाच्या ओवी तंतोतंत आजच्या मोर्चाला लागू पडतात. कारण हा मोर्चा कोण्या एका जातीचा नव्हता तर सर्वधर्मीय समाजाने या मोर्चाला आपला पाठिंबा देऊन रास्ता रोकोसाठी आपली उपस्थिती लावली होती.
ज्या अठरापगड जातीला सोबत घेऊन मराठा वंशज छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे तोरण बांधले पण याच मराठा समाजावर आरक्षण मागण्याची मोठी नामुष्की ओढवली आहे. ज्या मराठा क्रांती मोर्चाने आजवर न भूतो न भविष्यतो असे शांतता मार्गाने अनेक मोर्चे काढले. पण जालना या ठिकाणी झालेल्या क्रांती मोर्चा वरती जो पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये अनेक तरुण जखमी झाले. त्याचबरोबर महिलाही गंभीर जखमी झाल्या. त्याचा निषेध हा सर्वधर्मीय समाजाने रस्त्यावर उतरत हा रास्ता रोको अगदी शांतता प्रिय मार्गाने पार पाडला.
या रास्ता रोकोला मराठा आंदोलक मनोज पाटील व इतर आंदोलकांच्या पाठीशी संपूर्ण मराठा समाज असल्याचे जाहीर करण्यात आले. तर यावेळी अशोक शिंदे, सचिन बोगावत,जावेद शेख. मराठा वनवास यात्रेचे योगेश केदार आरपीआय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जगताप, मराठा महासंघाच्या महिला तालुकाध्यक्ष डॉक्टर पद्मा खरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या आंदोलनामध्ये भिगवण आणि भिगवण परिसरातील सकल मराठा समाजाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते दाखल झालेले होते. तसेच भिगवण परिसरातील अनेक सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या आंदोलकांवर जालना येथे झालेल्या घटनेबाबत अतिशय तीव्र पडसाद उमटत होते. सदर आंदोलनाच्या वेळी उपस्थित महिला भगिनी व मराठा महासंघाचा अपंग कार्यकर्ता यांच्या हस्ते इंदापूरचे नायब तहसीलदार ठोंबरे,भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन देण्यात आले.
दरम्यान, या आंदोलनामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघ. ग्रामपंचायत भिगवण, ग्रामपंचायत तक्रारवाडी, भोई समाज संघटना इंदापूर, अखिल भारतीय जैन संघटना, पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट. अमर बौद्ध युवा संघटना भिगवण,अखिल भारतीय कुंची कोरवे समाज भिगवण, मुस्लिम चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर, पिराचा दर्गा मज्जित ट्रस्ट भिगवण, भिगवण पत्रकार संघ, इत्यादी संघटनांनी आजच्या या रास्ता रोकोला पाठिंबा दिलेला होता.