पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महिलेचा एकटेपणाचा गैरफायदा घेऊन तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका २५ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रांतवाडी पोलिसांनी एका रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. राकेश सुनिल सरोदे (वय-३१, रा. विश्रांतवाडी) असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला ही तिच्या दोन मुलांसह राहत आहे. महिलेचे तिच्या पतीबरोबर कौटुंबिक न्यायालयात वाद सुरु आहे. फिर्यादी यांची २०२३ मध्ये राकेश सरोदे याच्याशी ओळख झाली होती. राकेश रिक्षाचालक आहे. त्याच्या रिक्षात बसून ती महिला गेली होती. त्यातून त्या दोघांची ओळख झाली. त्यांच्यात घट्ट मैत्री झाली.
दरम्यान, त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्याने त्या महिलेला सांगितले कि, माझे माझ्या पत्नीबरोबर पटत नाही. तिला घटस्फोट देऊन आपण दोघे लग्न करु असे सांगितले. त्यानंतर त्याने १८ सप्टेंबर २०२३ रोजी फिर्यादी यांना त्याच्या घरी नेऊन, तेथे त्यांच्याशी शारिरीक संबंध प्रस्स्थापित केले. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर आपण लग्न करु, असे खोटे सांगून त्याने वारंवार त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले.
मात्र, १ ऑगस्ट रोजी याच कारणावरुन त्या दोघांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर त्याने त्या महिलेचा संपर्क तोडला. आपली फसवणूक झाली असे त्या महिलेच्या लक्षात येताच तिने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन जाधव करीत आहेत.