शिरूर : जालना जिल्ह्यातील अंरतवली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानवी लाठीचार्ज केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटत आहेत. या निषेधार्थ फाकटे (ता. शिरूर) गावाने बंद पुकारला असून, स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सहकाऱ्यांसह उपोषण सुरू केले होते. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. या आंदोलनास ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला होता. आंदोलक मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालवत चालल्याने उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती. मात्र, ते उपोषणावर ठाम होते. याच वेळी पोलिसांनी आंदोलनात सहभागी असणाऱ्या तरुणांवर, स्त्रियांवर, लहान मुलांवर तसेच वृद्धांवर अंदाधुंद लाठीचार्ज केला. यामुळे गावातील तरुणांनी एकत्रित येऊन सरकारच्या निषेधार्थ गाव बंद पुकारल्याचे सरपंच रेश्मा पिंगळे यांनी सांगितले.
या वेळी महेश टेके, शंकर पिंगळे, राहुल वाळुंज, सचिन घारे, विनायक बोरूडे, ज्ञानेदव केदारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. टाकळी हाजी पोस्टचे पोलीस नाईक निलेश शिंदे, पोलीस कर्मचारी विष्णू दहिफळे यांनी गावात शांती राखण्याचे आवाहन केले. या मोर्चाला दुकानदार व समाजातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला.