लोणी काळभोर, (पुणे) : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील डोंगराळ भागातून जाणाऱ्या पेट्रोल – डिझेल पाईप लाईनवरच इंधन माफियांनी डल्ला मारत इंधन चोरी केली होती. मात्र, ही बाब उघडकीस येऊन सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही येथील एका शेतकऱ्याच्या विहरीला पेट्रोल – डिझेलचा झरा वाहू लागला आहे.
हवेली व पुरंदर तालुक्यातील डोंगर रांगेच्या पायथ्याला आळंदी म्हातोबाची हे गाव वसलेले आहे. डोंगर व माळरान भाग असल्याने येथे शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवत असते. ज्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, त्याच ठिकाणी चक्क पेट्रोल – डिझेलचे झरे वाहू लागल्याने शेतकऱ्याच्या विहरीचे पाणी दुषित झाले आहे. परिणामी जमीन नापीक झाली आहे. लगतच्या भागातील विहिरींचे पाण्याचे स्रोतही या इंधनामुळे प्रदूषित होत आहे. त्यामुळे डोंगर भागातून सखल भागाकडे येणाऱ्या पाणवठ्यांना डिझेलचा गंध येऊ लागल्याने परिसरात उग्र वास येत आहे. येथील पाणी जनावरांना देखील पिण्यासाठी योग्य नाही. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पेट्रोल विहिरीत पाझरून पाणी दूषित झाल्याने पिकांना पाणीही देता येत नाही. विहरीत पेट्रोल – डिझेल पसरल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सदर ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या विहरीमुळे आळंदी म्हातोबाची परिसरात पेट्रोल डीझेलची दुर्गंधी येत असून शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. याबरोबरच लगतच्या परिसरातील इंधन विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य राहिलेले नाही. तसेच शेतीला पाण्याचा दुसरा स्रोत उपलब्ध नसल्याने शेतकऱ्याला हेच पाणी शेतीला देण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे शेती नापीक होऊ लागली आहे. त्यामुळे केवळ शेतीवर उपजीविका असलेल्या शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटका बसत आहे.
परिसरात असलेल्या बोअरवेल आणि पाण्याच्या इतर स्त्रोतमध्ये मागील तीन ते चार महिन्यांपासून तेल उतरत आहे. याबाबतची माहिती संबंधित शेतकऱ्याने लोणी काळभोर येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली होती. पाईपलाईनमधील गळती बंद करण्याऐवजी, मागील तीन महिन्यांच्या काळात एका सक्शन पंम्प मशीनच्या साह्याने विहीरीतील दहा ते बारा टॅंकर तेल भरून नेले असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.
दरम्यान, विहीरीत पाण्याबरोबरच, पेट्रोल-डिझेल पाझरत असल्याने शेतकऱ्याला चार एकर शेती पडीक ठेवावी लागली आहे. त्यामुळे मला उभ्या शेतात पिक घेता न आल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीने त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.