डोर्लेवाडी / गोरख जाधव : महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. यात बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील युवा शेतकरी राहुल चव्हाण यांनी चार एकरावर पेरूची बाग लावली होती. याचे देखील नुकसान होत आहे. सद्यस्थितीत राज्यभरातील शेतकरी पाऊस नसल्याने चिंताग्रस्त झाला आहे.
पाणी नसल्याने शेतीतील पिके जळू लागली आहेत. मात्र, अशा परिस्थितीतही बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील राहुल चव्हाण या फळ उत्पादक शेतकऱ्याने चार एकर क्षेत्रात व्होनार व तैवान पिंक या दोन जातींच्या पेरू फळाचे ७० ते ८० टन उत्पादन घेतले आहे. पूर्वीच्या डाळिंब पिकावर सतत पडणाऱ्या मर व तेल्या रोगामुळे डाळिंब बाग नष्ट करून कृषी अमृत शेतकरी गट यांच्यात विचारविनिमय करून तीन वर्षांपूर्वी पेरू या फळ पिकाची लागवड करण्याचे निश्चित करून व्होनार व तैवान पिंक या उत्कृष्ट जातीच्या झाडांची लागवड केली.
व्होनारची १२०० रोपे छत्तीसगड रायपूर येथून तर तैवान पिंक ही १८०० रोपे बारामती परिसराच्या नर्सरीतूनच घेतली व चार एकर क्षेत्रात याची लागवड केली आहे. सध्या या पेरूंची तिसरी तोड आहे. हा पेरू नेपाळसह भारतातील केरळ, आंध्रप्रदेश या पेरूला या भागातून मागणी आहे. व्होनार या पेरूला प्रति किलो ४५ ते ५० रुपये तर तैवान पिंक पेरूला प्रति किलो ३५ ते ४० रुपये दर मिळत आहे.
रोपांच्या लागवडीनंतर व्होनाराला दीड वर्षानंतर तर तैवान पिंक या रोपांना एक वर्षानंतर फळधारणा सुरू झाली. व्होनाराला पहिल्या वर्षी १५ टन तर तैवान पिंक १२ असे एकूण २७ टन उत्पादन मिळाले. याला अनुक्रमे ५० रुपये व ४० रुपये दर मिळाला. पहिल्या वर्षी खर्च वजा जाता ७ ते ८ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. तर दुसऱ्या वर्षी झाडांचा आकार वाढल्याने दोन्ही जातीच्या झाडांचे मिळून ५० टन उत्पादन निघाले. यातून त्यांना १० ते १२ लाख रुपये निव्वळ नफा राहिला.
व्होनार जातीच्या पेरू रोपांची लागवड करत असताना २ रोपांमध्ये त्यांनी १३ बाय ६ तर तैवान पिंक या रोपाची ८ बाय ५ वर लागण केली. लागवडीदरम्यान शेणखत, बेसलडोस दिला. त्यानंतर वेळोवेळी ड्रीप फर्टीलायझर, पाणी तसेच झाडांची वाढ होण्यासाठी झाडांची छाटणी केली.