पुणे : पुणे विमानतळावरील 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी रस्ता जोडण्यासाठी व पुणे महानगरपालिकेला काम करण्यासाठी संरक्षण विभागाने परवानगी दिल्याची माहिती खासदार गिरीश बापट यांनी दिली आहे.
यापुढे बोलताना गिरीश बापट म्हणाले, “पुणे विमानतळापासून विमाननगरला जोडणारा पर्यायी रस्त्यावर असलेली संरक्षण विभागाची केवळ 0.58 एकर (2350 चौ.मी.) जागेवर पुणे मनपाला काम करण्यास परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे सदरचा रस्ता गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होता. नागरिकांना विमाननगरला व विमानतळावर जाण्यासाठी इतर पर्यायी दूरच्या रस्त्यांचा वापर करावा लागत होता.”
या भागात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत होती. पर्यायाने नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यास विलंब व मानसिक त्रास होत होता. तसेच नवीन विस्तारित विमानतळासाठी देखील सदर रस्ता होणे अत्यंत गरजेचे होते. त्यामुळे सदरची जागा पुणे मनपाला रस्ता बनवण्यासाठी नाममात्र दरात उपलब्ध करून रस्त्याचे काम तातडीने सुरू होण्यासाठी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे कडून केंद्रीय संरक्षण मंत्री, नागरी विमान वाहतूक मंत्री आणि संबधित विभागाचे अधिकारी यांचे स्तरावर पाठपुरावा सुरू होता.
सदर पाठपुराव्यामुळे नुकतीच संरक्षण मंत्रालयाने विशेष बाब म्हणून दि सोमवारच्या (ता. १९) आदेशानुसार पुणे विमानतळावरून 0.58 एकर (2350 चौ.मी.) संरक्षण जमिनीवर विमाननगरला पर्यायी प्रस्तावित २० मीटर रुंद असलेला रस्ता जोडणीसाठी पुणे महानगरपालिकेला काम करण्याची परवानगी दिली आहे. यासाठी नाममात्र रुपये वार्षिक परवाना शुल्कावर परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, (1/- प्रति चौ.मी. रु.2350/- प्रतिवर्ष) यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू होणार आहे. IAF जमिनीच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांचा भाग पुणे महानगरपालिकेने यापूर्वीच पूर्ण केला आहे. या रस्त्यामुळे पुणे विमानतळाकडे आणि तेथून जाणाऱ्या वाहनांची वाहतूक सुरळीत आणि वाहतूक कोंडी कमी होणार आहे.