पुणे : पुण्यातील एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन आता चांगलेच तापले असून या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईनंतर नवा वाद निर्माण झाला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आल्याने वातावरणात मोठा तणाव पसरला आहे. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार अत्यंत आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

पोलीस प्रशासनाकडून दाखल करण्यात आलेल्या FIR वर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांवर लावण्यात आलेली कलमे अत्यंत धक्कादायक आणि चुकीची आहेत. आंदोलकांच्या हातात दगड आणि रॉकेट असल्याचा उल्लेख या गुन्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. शांततापूर्ण मार्गाने लढणाऱ्या परीक्षार्थींना गुन्हेगार ठरवून आंदोलनाला बदनाम करण्याचा हा कट आखला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

तसेच, हे संपूर्ण प्रकरण म्हणजे विद्यार्थ्यांची प्रतिमा डागाळण्याचा स्पष्ट प्रयत्न असल्याचा दावाही त्यांनी केला.रोहित पवार यांनी भाषण करताना सूचक वक्तव्य केले असून, “आज कदाचित माझी ही शेवटचीच सभा असू शकते” असा उल्लेख त्यांनी केला. यावर पुढे बोलताना त्यांनी, “अशी कारवाई होणार असेल तर ही चांगली गोष्ट आहे ना, ज्यांना जे काही समजायचे आहे त्यांनी ते समजून घ्यावे,” असा टोलाही प्रशासनाला लगावला.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या दाबण्यासाठी पोलीस बळाचा गैरवापर केला जात असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा आणि लढा सुरुच ठेवण्याचा पुनरुच्चार केला आहे.







