बापू मुळीक
पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या क्रीडा महोत्सवातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडविण्याचे काम होत आहे. खेळातून खेळाडूंचे मानसिक स्वास्थ्य सदृढ होत असते. सकारात्मकता, चिकाटी, दूरदृष्टी याचे उपयोजन करून खेळात यश संपादन करता येते. विज्ञानातील तथ्य दिशा, वेळ आणि गती यांचा मेळ साधत यशाला गवसणी घालता येते. येथे सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक जाणिवा विकसित करणारे संदेश हे सामाजिक अभिसरण घडविणारे आहेत. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरी कौतुकास्पद असून ही संस्था लवकरच स्वतंत्र विद्यापीठ म्हणून नक्कीच पुढे येईल. असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने सासवड येथील वाघिरे महाविद्यालयात आयोजित जिल्हा क्रीडामहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. गोसावी बोलत होते. या प्रसंगी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी विद्यार्थी संघाचे सचिव एम. एस. जाधव, जेष्ठ नेते विजय कोलते, बाळासाहेब भिंताडे, योगेश फडतरे, युनिस स्पोर्ट्सचे मृणाल पाठक, योगेश रवदंळे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख, उपसचिव एल. एम. पवार, सहसचिव ए. एम. जाधव त्याचप्रमाणे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. छात्रसेना, स्काऊटच्या विद्यार्थ्यांनी शानदार संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. राष्ट्रीय खेळाडू प्रतीक्षा जगताप हिने खेळाडूंना शपथ दिली. यावेळी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आभार प्राचार्य डॉ.पंडीत शेळके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड, डॉ. किरण गाढवे यांनी केले. संस्थेतील सर्व शाखाप्रमुख आणि क्रीडाशिक्षकांनी या क्रीडा महोत्सवाचे संयोजन केले.