पुणे : दस्त हाताळणी शुल्क भरण्यासाठी केवळ एसबीआय गेटवेचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होता. मात्र, आता सर्व प्रकारच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार आहे. ही सुविधा सुरू करण्यात आली असून विभागाच्या वतीने जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन देण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
दस्त नोंदणी करताना आकारण्यात येणारे दस्त हाताळणी शुल्क केवळ ‘एसबीआय ई-पे’ या प्रणालीद्वारे भरता येत होते. आता एसबीआयसोबतच सर्व प्रकारचे डेबिट आणि क्रेडिट कार्डाद्वारे हे शुल्क भरता येणार आहे. ही सुविधा राज्यभरात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे. दस्त नोंदणी करताना किती पाने आहेत, त्यांचा हिशेब करून रोख पैसे द्यावे लागायचे.
अनेकदा सुट्टे पैसे नसल्यामुळे हेलपाटे मारण्याची वेळ खरेदीदारावर येत होती. दस्तनोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात प्रतिपान २० रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे दस्तांची पाने जितकी जास्त तितके शुल्क नागरिकांना भरावे लागते. मात्र, अनेक कार्यालयात प्रतिपान शंभर रुपये शुल्क आकारून नागरिकांची लुबाडणूक होते.
या पार्श्वभूमीवर हाताळणी शुल्क ऑनलाइन भरण्याची सुविधा सन-२०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पुणे शहर आणि जिल्ह्यात सुरू करण्यात आली होती. त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरात या सुविधेची अंमलबजावणी सुरू झाली होती. मात्र, ही सुविधा केवळ एसबीआयच्या ऑनलाइन प्रणालीपुरतीच मर्यादित होती. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त हाताळणी शुल्क भरण्यासाठी आता सर्व प्रकारची डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरण्याची सुविधा सुरू केली आहे.
याबाबत बोलताना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाचे श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘वस्तू व सेवा करानंतर (जीएसटी) राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची ओळख आहे. करोनानंतर राज्यातील सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. त्यामुळे करोनापूर्व काळाप्रमाणे सध्या राज्यात दररोज साडेनऊ ते दहा हजार दस्त नोंद होतात. मात्र, दस्त हाताळणी शुल्क भरण्याची सुविधा केवळ एसबीआयच्या प्रणालीद्वारेच भरता येत होती. सर्वच नागरिकांकडे एसबीआयची ही सुविधा असणे शक्य नसल्याने नागरिकांना त्रास होत होता. मात्र, आता सर्व प्रकारच्या डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे दस्त हाताळणी शुल्क भरता येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.