संभाजीनगर, ता.२६ : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. त्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलन सुरु केले आहे. हाच मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, मराठा आरक्षणासाठी गुरुवारी (दि.२६) दिवसभरात तिघांनी आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे हा प्रश्न अत्यंत गंभीर बनत चालला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी उपोषण केले होते. तेव्हा मात्र राज्य सरकारकडून त्यांना आरक्षण देण्याबाबतचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ४० दिवसांचा अल्टिमेटम देत उपोषण मागे घेतले होते. मात्र, ४० दिवस उलटूनही हा प्रश्न मार्गी लागला नाही. अखेर त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्याला मराठा समाजातील असंख्य बांधवांकडून पाठिंबा मिळत आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण मिळण्यासाठी होत असलेल्या टाळाटाळ यामुळे मराठा तरूण नैराश्येत जात आहे. त्यातून आत्महत्या करण्यासारखं टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे.
मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना आत्महत्या करू नका, असे आवाहन करून देखील आज दिवसभरात मराठवाड्यातील हिंगोली, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहणाऱ्या तिघांनी आत्महत्या करून जीवन संपवल्याची घटना घडली. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
संभाजीनगरमधील एकाची गळफास घेऊन आत्महत्या
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील राजनगर येथे राहणाऱ्या सुनील कावळे यांनी मुंबई येथे जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेनंतर कोणीही आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. पण तरीही आत्महत्या होताना दिसत आहे.
२५ ऑक्टोबरपासून उपोषणाला सुरुवात
राज्य सरकारने आरक्षणाचा प्रश्न न सोडविल्यामुळे जरांगे पाटील यांनी बुधवार २५ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये साखळी उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करत जरांगे यांना पाठिंबा सुरू आहे. यातच आज मराठवाड्यात तिघांनी आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले. या घटनांमुळे मराठा समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे.