पुणे : पुण्यातील पौड पोलिस ठाण्याच्या हद्दीत करमोळी गावाजवळ मुळा नदी पात्रालगत गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 4 लाख 20 हजार रूपये किंमतीची गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. पुरूषोत्तम महिंद्रा बिरावत (रा. वारू, ता. मावळ), विर राम बिरावत (रा. करमोळी, ता. मुळशी) आणि नितीन देवेंद्र बिरावत (रा. करमोळी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मुळा नदी पात्रालगत मोठया प्रमाणावर बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी दारू तयार करत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पौड पोलिसांनी गावठी हातभट्टीवर कारवाई केली आहे. पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी तात्काळ दोन पथके तयार करून करमोळी गावालगत असलेल्या गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयावर कारवाई करण्यास सांगितले.
पोलिस पथकाने सदरील ठिकाणी छापा टाकून दारू अड्डा उध्वस्त केला. या कारवाईमध्ये 4 लाख 20 हजार रूपये किंमतीची 16 हजार 850 लिटर हातभट्टी तयार दारू तसेच तयार करण्यासाठी लागणारी उपकरणे, जर्मन भांडी, इलेक्ट्रीक पाण्याची मोटर आणि दुचाकी असा एकुण 4 लाख 88 हजार रूपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मनोजकुमार यादव, सहाय्यक उपनिरीक्षक बाबा शिंदे, संतोष कुंभार, पोलिस हवालदार मनोज कदम, अनिता रवळेकर, पोलिस अंमलदार सचिन सलगर, अक्षय यादव, रेश्मा साठे यांच्या पथकाने केली आहे.