-गणेश सुळ
केडगाव : सदैव प्रवाशांच्या सेवेसाठी… हे ब्रीदवाक्य घेऊन चालणारी एसटी म्हणजे राज्यातील प्रत्येक गावाला जोडणारी रक्तवाहिनी. अगदी सर्वसामान्य प्रवाशापासून ते मध्यम वर्गाच्या खिशाला परवडणारी ही लालपरी. परंतु या नादुरुस्त व मटेरीयल अभावी लालपरी मुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहे.
घाडगे तळई (राहु – पारगाव) या गाव-खेड्यांपासून ते पुणे शहरांकडे जाण्यासाठी एसटी बस सुविधा उपलब्ध आहे. यातीलच एक बस सकाळच्या सुमारास पिंपळगाव परिसरात पंक्चर झाल्याने रस्त्यातच उभी करावी लागली होती. इतर सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे राहून इतर वाहनाची प्रवासासाठी वाट पाहत उभे होते. मागील काही महिन्यांपासून अनेक बसची दुरवस्था झाली आहे. अनेक गाड्यांच्या खिडक्या, आसने तुटलेली आहेत. गळके छप्पर, तर कधी खालच्या बाजूने पावसाचे पाणी गाडीत येते. वेळेत बस न येणे, प्रवासादरम्यान मध्येच बस नादुरुस्त, तसेच टायर पंक्चर होण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत.
ग्रामीण भागातील दळणवळणात एसटी महामंडळाच्या ‘लाल परी’ची महत्त्वाची भूमिका आहे. पुणे आगारातून गाव-खेड्यांपासून लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील प्रवाशांना दिलासा मिळाला; मात्र नादुरुस्त बसमुळे शाश्वत प्रवासाची हमी दुरावली आहे.
अनेक बसमधील आसने तुटलेली आहेत. बसच्या खालच्या बाजूने पाणी प्रवाशांच्या अंगावर येते. अनेक बस रस्त्यातच नादुरुस्त होत आहेत. पंक्चर झालेला टायर काढण्यासाठी सर्वच बसमध्ये स्टेपनीसारखी अवजारे नसतात. त्यामुळे प्रवाशांना बसमधून उतरवून दुसऱ्या बसमध्ये बसण्याची व्यवस्था वाहकाला करावी लागते. त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतो. ग्रामीण भागातून जेष्ठ नागरीक ससून रुग्णालयात उपचारासाठी नियमित जात असतात अशा रुग्ण प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. विद्यार्थी शाळेत, चाकरमानी कार्यालयात अथवा घरी वेळेत पोहोचत नाहीत.
मागील अनेक महिन्यांपासून अनेक तालुक्यातील विद्यार्थी, चाकरमानी आणि अन्य प्रवासी त्रास सहन करत आहेत. सरकारने वयोवृद्धांना मोफत, तर महिलांना अर्ध्या भाड्यांत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली; मात्र बससेवा इच्छीतस्थळी सुखरूप पोहोचवेल, याची शाश्वती राहिलेली नाही.
सरकारने महिलांना अर्ध्या भाड्यात प्रवासाची सुविधा दिली, ही स्वागतार्ह बाब आहे; मात्र त्यांना इच्छीतस्थळी सुखरूप पोहोचवतील, अशी काही बसची स्थिती राहिलेली नाही. जुन्या बसमुळे विद्यार्थी, महिला आणि चाकरमानी हैराण होत आहेत. या आगाराच्या बहुतांश गाड्यांची अवस्था अगदीच जेमतेम आहे. त्याच अवस्थेत प्रवास करावा लागतो.
-विशाल गायकवाड – प्रवासी